गहिवर -अशीच एक पेठचीच कथा
![]() |
| गहिवर -अशीच एक पेठचीच कथा |
*नमस्कार,*_
आजकाल अशा बऱ्याच घटना आपल्या आसपास पहायला मिळतात. अविचारांमुळे सहनशक्ती कमी झाली आहे. स्री स्वातंत्र्याच्या नावाखाली व कायद्याच्या संरक्षणामुळे नाती कोलमडू लागली आहेत. न्यायालयात फारकतीच्या खटल्यांची संख्या वाढू लागली आहे. दरवेळी मुलाच्याच घरच्यांची चूक असते हा समज खोटा आहे. महिला आयोग किंवा चौकशी अधिकाऱ्यांचीही काही वेळा गफलत होते. जसे दिसते तसेच असते असे नाही, काही वेळा दाखवले जाते, त्यामुळे निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे व त्यानंतरच निर्णयावर आले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नात्यांत पारदर्शकता असली पाहिजे. काही गोष्टी पटत नसल्यास त्याचा वेळीच उलगडा झाला पाहिजे म्हणजे भविष्यात होणारा मनःस्ताप टाळता येऊ शकेल व गहिवर येण्याची वेळच येणार नाही. असो.
--*🌼*--
_*गहिवर.....*_
_लेखिका- अनामिका._
अरविंदचं तीन दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. चांगली देखणी बायको त्याला मिळाली होती. तसा अरविंदही दिसायला छान गोरा वर्ण, भरपूर उंची भरदार शरीर यष्टी चांगल्या पगाराची नोकरीं आणि स्वतःजवळ असणारी चांगली तीन एकर बागायती जमीन, शिवाय स्वतःच छोटेखानी टूमदार घर... अजून एका मुलीला काय हवं? त्यात अरविंद एकुलता एक मुलगा शिवाय निरव्यस्नी सुद्धा....
भागाबाई आणि तुकारामला लग्नानंतर खूप वर्षांनी अरविंद झाला होता. म्हणून अगदी डोळ्यात तेल घालून त्यांनी अरविंदला जपलं होतं. त्याच्यापाठीवर त्यांना दुसरं अपत्य झालही नव्हतं... काय होतं ते सर्वस्व अरविंदच.. त्यांची दुनिया सगळी... त्याच्या सुखात यांचं सुख समावलेलं... अत्यंत काबाड कष्ट करून त्यांनी मुलाला मोठं केलेलं सुदैवाने मुलगा गुणी निघाला... त्याला नोकरीही मनासारखं लागली... सगळं कसं गोड गोड....
आणि आता तीन दिवसापूर्वी लग्न झालेलं. घरात सुनबाई आलेली. नव्या नवरीची नवलाई. भागाबाईला अतिशय आनंद झालेला... ती जाईल तिथे सुनेला सोबत नेऊ लागली. मुलगा दिवसभर जॉब ला आणि सुनबाई भागाबाई सोबत रानात... खरंतर सुनेच्या चेहऱ्यावर शेतीच्या नुसत्या नावाने बारा वाजत पण काय करणार, नवीन नवीन तिला काही बोलता येईना... भागाबाईला आकाश ठेंगन वाटू लागलं... आपल्या पदरातल्या सुखाला कोणाची नजर लागू नये यासाठी स्वतःचीच दृष्ट काढावी कि काय असंही वाटलं... पण नजर लागलीच...
हळूहळू सुनेच्या व्यवहारात बदल झाला... रोज घरात भांडणे होऊ लागली. सून सासू सासऱ्याचे ऐकेना झाली... नवऱ्यापाशी नोकरीच्या ठिकाणी वेगळे बिऱ्हाड मांडण्याचा हट्ट धरू लागली... अरविंदला ते पटत नव्हते.. म्हाताऱ्या आई वडिलांना कोठे सोडणार आणि कोणाच्या भरवश्यावर... आई वडील आता खूप थकलेत आणि ते आपल्यासाठीच याही वयात काम करतात याची जाणीव अरविंदला होती... सून ऐकेना ति माहेरी आठ आठ दिवस जाऊन राहू लागली.
शेवटी भागाबाईने मुलाची समजूत काढली. सुनेला नोकरीच्या गावी घेऊन जायला सांगितलं. उगाच गावात तमाशा नको आणि तुला आठवेल तेव्हा येत जा भेटायला असे सांगून तिने त्याला नवीन बिऱ्हाडासाठी स्वतःच्या हाताने टेम्पो भरून पाठवून दिला...
.. अरविंद चा कंठ दाटून आला पण जाणे भाग होते. नव्याने तो संसार करू लागला... बायकोचा हट्ट पूर्ण करू लागला. थोड्या दिवसात तिला दिवस राहिले. भागाबाईला आकाश ठेंगणे झाले.. अरविंदला मुलगी झाली गोड सुंदर... त्याने तिचे नाव परी ठेवले..
परी जेमतेम दोन वर्षाची झाली आणि अचानक अरविंदची बायको घर सोडून निघून गेली... तिच्या घरच्यांनी अरविंद आणि त्याच्या आईवर केस केली... आता अरविंदने खोली सोडली आणि तो पुन्हा आई कडे गावाला येऊन राहू लागला.. बायकोचा शोध घेऊ लागला... पण बायकोचा काही पत्ता लागेना...
एके दिवशी त्या मुलीच्या बापाने जवळ जवळ दोन महिन्यानी तिला अरविंदकडे आणून सोडली आणि केस मागे घेतली... ती इतके दिवस कुठे होती काय करत होती हेही विचारण्याचे धाडस या माणसांना राहिले नव्हते.. लोक आत्तापर्यन्त नको तितके त्यांच्या इज्जतीचे वाभाडे काढून मोकळे झाले होते...
अरविंदला लग्न करून पश्चाताप झाला होता. म्हाताऱ्या आईवडिलांना या वयात होणारा मनस्ताप त्याला समजत होता... त्याला वाटलं हिला घरातून हुसकून द्यावं पण.... पण म.. परिचं काय? आईसारखं प्रेम कोण देईल तिला? तिचा काय दोष? यापेक्षा नशिबाला स्वतःच्या दोष देऊन त्याने तिचा स्वीकार केला...
तो जगत होता पण... ते जगणं काय जगणं होतं? आई भल्या पहाटे शेतात जाई आणि अगदी अंधार पडल्यावर घरी येई... तिचं मन समजत तर होता त्याला, पण कोणाला बोलणार होता तो? मुलाची मजबुरी आईला समजत होती. लेकराला त्रास नको म्हणून ती हसून समजून घेत होती...
काही दिवस असेच गेले.. कोणी कोणाशी नीट बोलत नव्हते. अगदी अरविंदही बायकोचे नाव घेत नव्हता... त्याच्या मनात नाना शकांनी घर केलं होतं.... कुठे होती ही दोन महिने.. का गेली होती... याकाळात माझ्या घरच्यांनी किती भोगलं? आणि आता ही परत का आली, सगळंच कोडं...
अशाच एका सकाळी सुनेने महिला मंडळाच्या बाया बोलावल्या. सासू नवऱ्याला फितवते आणि माझ्याशी बोलू देत नाही, माझा छळ मांडलाय, असं म्हणून रडू लागली.... महिला मंडळच तें... त्यांना खऱ्या गोष्टी कोण सांगणार? त्यांनी नको तितका तमाशा घातला भागाबाईभोवती... आणि त्या दोघांना वेगळं बि-हाड करुन देण्याविषयीं सांगून गेल्या....
मुलगा हतबल झाला जेव्हा तो कामावरून आला आणि त्याला सगळं समजलं तेव्हा.. काय करणार होता तो तरी? त्याचा लग्न, प्रेम यावरून विश्वासच उडाला... बायकोची किळस आणि राग येऊ लागला, पण परी.... झालं, राहिला तो वेगळा... पण अरविंद बायकोशी मातृर बोलला नाही...
तो सकाळी पाच ला कामावर निघाला कि बायको गाढ झोपलेली असायची.. त्याला डबा नाही अन काही नाही... खा किंवा नको खाऊ.... त्याची आई चार ला उठायची लेकरू डबा न घेता कामाला जातो हे तिला समजलं आणि तिला राहवलं नाही. दुसऱ्या दिवशी तिने चारला उठून पहिले डबा केला... गुपचूप मुलाला दिला... त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून ती म्हणाली "चार घास खा पोरा, उपाशी काम नको करू..." स्वतःचं पाणी डोळ्यातच ठेवलं आणि तो आईचा निरोप घेऊन कामावर गेला...
साधारण पाच वाजता तो कामावरून घरी आला.... डबा आईकडे द्यायचं लक्षातच नाही राहीलं... बायकोने डबा पाहिला... काय समजायचं तें समजली आणि नको तो तमाशा घातला...
रात्री किती तरी वेळ भांडणाचा आवाज भागाबाई पर्यंत येत राहिला. तरीही पुन्हा पहाटे आईचा जीव, तो जेवण बनवू लागला... कोणाला दिसू नये म्हणून घराच्या अडोशाला उभी राहून ति माऊली वाट पाहू लागली पण... अरविंद आज तिकडून गेलाच नाही... नवरा बायको चे डब्यावरून कडकडीत भांडण झाले होते.... आजही झोपेतून ती उठली नाही, तो रागातच तिला म्हणाला, "आईचा डबा चालत नाही तर तू उठून द्यायचा करून, कशाला मग ती देईल "
"हो ना तू आईच्या पदरातलं बाळ, मोठं तर होणारच नाही.. डबा नाही नेलास तर काय मरणारेस का."
शब्दाने शब्द वाढला... बायको नको नको तें बोलली.... अखेर रागातच त्याने घर सोडलं आणि तो डांबरी रस्त्याने सुसाट पळत सुटला... लग्न, आई, बायको, बाप, धोका, मुलगी... सांगड कशी घालायची? कोणाला सोडायचं? कसं माफ करायचं? तोही पिसतोय... पण कायदा तिच्या बाजूने... त्याला महिला मंडळाचा तमाशा आठवला... काय चूक होती आपली...
सोडायला पाहिजे ,पण मुलगी? तिची चूक? आणि.... बायकोचे खोटे आरोप, सगळं सगळं कसं असह्यय....
अचानक समोरून मातीचा ढम्पर वेगात आला आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं...
अरविंद चं प्रेत समोर पडलं होतं.... म्हातारा एका बाजूला धोतरात तोंड खुपसून लहान बाळा सारखा रडत होता... आणि म्हातारी म्हणत होती, "बाळा अजून काय करू रे तुझ्यासाठी... लेकरा घास खाल्ला नाहीस रे... मी केला होता... माझ्या लाडक्या..." सगळं गाव जमा झालं होतं... हळहळलं होतं....
कित्येक दिवसांनी दुसऱ्या एका केस साठी महिला मंडळाची अध्यक्ष या नात्याने परत तिकडे जाणं झालं... म्हातारी अंगणात भर दुपारची शून्यात पहात बसली होती. आपली चूक झाली या केसच्या बाबतीत असं मला वाटत होतं...
मी म्हातारीचा हात हातात घेतला. तिची विचारपूस केली. ती खिन्न हसली. म्हणाली, "बये आता नको विचारू काही, सम्पलं सगळं...."
मी घरात डोकावलं. तिची सून असेल असं वाटलं. ती म्हणाली "सुनेचं आधीच लफडं होतं बाई... लग्ना आधीच... गेली ती निघून... पोरीला माझ्यापाशी ठेऊन... माझ्या लेकराची निशाणी.."
मी सुन्न झाले. एका आईचा आधार परत मिळणार नव्हता... तिचा आक्रोश माझं हृदय हेलावत होता....
म्हातारी शांतपणे उठली. काठी टेकत आत गेली... लेकाच्या तसबिरीपुढं उभी राहिली..... मीही फोटोतल्या त्या चेहऱ्याकडं पाहिलं... शांत असणारा अरविंदचा चेहरा पाहून गहिवारल्यासारखं झालं... मी परत फिरले...
_*लेखिका - अनामिका.*_
(कुणी लिहिलं ते माहीत नाही पण प्राप्त प्रतिक्रिया मुळ लेखिकेस सादर समर्पित. नाव माहीत झाल्यास आवश्यक तो बदल करण्यात येईल. अशा कथा वाचण्यासाठी माझ्या *9325927222* या व्हाटसअप क्रमांकावर संपर्क साधा -मेघःशाम सोनवणे)
आजची ही कथा *श्री. किरण वाघ, वडगाव काशिमबेग, पुणे,* यांच्या सौजन्याने.
_


